देव तारी त्याला कोण मारी.
हया म्हणीचा वापर करताना आपणास अनेकजण दिसतात. परंतू याचा प्रत्यय मला स्वतःला माझ्या उतार वयात दिनांक १२/१०/२०१७ रोजी प्रत्यक्ष आला, तो कसा
आला हे मी थोडक्यात खालीलप्रमाणे सांगु इच्छीतो.
नर्मदा परिक्रमेप्रमाणेच दत्त परिक्रमा असल्याचे आपल्या वाचण्यात आलेले असेलच. श्री. दत्त परिक्रमा म्हणजे श्री दत्ताची २४ स्थाने असून ही चोवीस स्थाने प्रामुख्याने महाराष्ट्र,
कर्नाटक व गुजरात राज्यांत आहेत. हया चोवीस स्थानांना भेट देउन श्री दत्ताचे दर्शन घेतले असता दत्त परिक्रमा पुर्ण झाल्याचे मानले जाते. कर्दळीवन सेवा संघ, डेक्कन जिमखाना येथे श्री दत्त स्थानांची माहिती पुस्तके उपलब्ध होवू शकतात.
श्री दत्त परिक्रमेचाच भाग म्हणून मी, माझी पत्नी सौ. मंगल, माझे मेहुणे व त्यांची पत्नी यांनी दिनांक ८.१०.२०१७ रोजी प्रवासास सुरूवात केली. प्रथम मंत्रालय व तेथून खाजगी
वाहनाने कुरवपूर, जिल्हा रायचूर, कर्नाटक येथे श्री दत्त दर्शनास आलो. कुरवपूर येथे श्री श्रीपाद वल्लभांचे मंदिर कृष्णा नदीच्या काठी असून श्री श्रीपाद वल्लभ हे श्री दत्तगुरुंचा पहिला अवतार असल्याचे मानले जाते. त्यांचा जन्म पिठापूर, आंध्र प्रदेश येथे झालेला असला तरी त्यांचे बारा वर्षे वास्तव्य कुरवपूर येथे होते असे मानले जाते.
कुरवपूर हे रायचूर जिल्हयात असून ते कर्नाटक - तेलंगणा राज्याच्या सीमेवर आहे. रायचूर पासून हे स्थान अंदाजे ६० किमी. अंतरावर असुन दोन्ही राज्यांच्या सीमेवरुन कृष्णा नदी वाहते. कुरवपूर हे एक रिमोट प्लेस असून श्री श्रीपाद वल्ल्भांचे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर आहे व कुरवपूर हे गांव प्रत्यक्षात तेथून अंदाजे २ फर्लांग अंतरावर आहे.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नगण्य असून भाविक शक्यतो खाजगी वाहनानेच येथे येतात. कृष्णा नदीच्या काठावर येऊन लोखंडी कढईत बसून मंदिराजवळ जावे लागते. कृष्णा नदीचे पात्र विशाल असून आम्ही गेलो तेव्हा पावसामुळे व वरच्या भागात असणा-या धरणातील पाणी सोडल्यामुळे कृष्णा नदी दुथडी भरुन वाहत होती. कुरवपूर मंदिर एका बेटावर असुन घाटाच्या पाठीमागूनही कृष्णा नदी वाहते.
दिनांक ११.१०.२०१७ रोजी रात्री तेथे मुक्काम करुन दि. १२.१०.२०१७ रोजी आम्ही सकाळीच ५ ते ५.३० च्या दरम्यान नदीच्या घाटावर स्नानासाठी गेलो. मी घाटावर
पोहोचण्यापुर्वीच तिघांची स्नाने आटोपून ते वरच्या पाय-यांवर अंग पुसत होते. कोणत्याही तिर्थक्षेत्री नदीत /समुद्रात स्नान न करण्याचा माझा स्वभाव असल्यामुळे पत्नीने रुमजवळील पाण्याच्या टाकीमधून एक बादली पाणी आणून दिल्यावर तेथेच स्नान करावे असे सांगीतले. पायांचे तळवे भिजतील एवढया पाण्यात मी दोन्ही पाय खाली सोडून पायरीवर बसलो होतो. इथेच अंगावर बाटलीने पाणी घ्यावे कि रुमजवळ जावे हया विचारात मी असतानाच माझा उजवा पाय पाठीमागुन कोणीतरी धरल्याचे मला जाणवले. मी पाय सोडविण्याचा प्रयत्न करीत होतो. पुराचे पाणी, थोडासा अंधार हयामुळे मला पाठीमागचे दिसत नव्हते. कोणीतरी मला पाण्यात ओढत आहे असे जाणवत होते. मी पायरीला धरुन वर येण्याचा प्रयत्न करीत होतो. अचानक झालेल्या या झडपेमुळे मला ओरडून हाक मारायचे सुचले नाही परंतु माझ्या पत्नीला मी पाण्यात खोल जात असल्याचे दिसले व ती मोठमोठयाने ओरडू लागली. माझे मेहुणे दुस-याच पायरीवर अंग पुसत होते. त्यांनी त्वरीत माझे डोके धरुन मला पाण्याबाहेर ओढण्याचा प्रयत्न केला परंतू त्यांना ओढणे शक्य होत नव्हते. तितक्यात कोणीतरी पाण्यात मला उलटे केल्याचे जाणवले. त्यावेळी मी मागे वळून पाहीले असता माझा पाय एका प्रचंड मगरीने धरल्याचे माझ्या लक्षात आले. तिचा जबडा एवढा मोठा होता की आता आपला पाय तिच्या जबडयातुन सुटण्याची शक्यता नसल्याचे मला जाणवले. मृत्यू प्रत्यक्ष समोर दिसत होता. क्षणार्धात माझ्या जीवनाचा पट माझ्या डोळयासमोरुन तरळून गेला.
मगरीने मला पाण्यात उलटे केल्यामुळे माझ्या मेव्हण्यांना माझा हात दिसला. त्यांनी चपळतेने हात काखेत पकडून मला ओढण्याचा प्रयत्न केला परंतु मगरीची ताकद प्रचंड
असल्यामुळे त्यांना यश येत नव्हते. शेवटी एक छोटासा दगड त्यांच्या पायाला लागला व त्या दगडाला पाय रोवून ताण देवून त्यांनी मला ओढले. मगरीने पाय मागच्या बाजूने पकडल्यामुळे, व समोरील हाडात तिचे दात न घुसल्यामुळे माझा पाय तिच्या तोंडातून सुटला, परंतू पायाचा पाठीमागील संपुर्ण भाग, मांस तिच्या तोंडात अडकून ओढला गेला. पायाच्या समोरील भागातील एक हाडाची पट्टी तेवढी राहिली. मेव्हण्यास मगर दिसली नसल्यामुळे त्यांनी मला पाण्याच्या बाहेर येण्याविषयी सांगीतले. परंतू मला स्वतःला पाण्याबाहेर येता येत नसल्यामुळे त्यांनी व माझ्या पत्नीने मला वर आणले. गुडघ्याच्या खाली पायाचे फक्त कातडे चोहोकडुन लोंबत होते. घाट रक्ताने पुर्णपणे लाल झाला होता. पत्नी रडत होती तर मेव्हण्याला पुढे काय करावे हयाबाबत सूचत नव्हते.
आम्ही घाटावर चौघेजणच होतो. ओरडल्यामुळे २-३ लोक आले, एका शेतक-याने स्वतःचे धोतर फाडून माझ्या पायाला बांधले. परंतु रक्तप्रवाह थांबत नव्हता. वाहन व्यवस्था
नाही, गांव जवळ नाही, दवाखाना नाही, कढईशिवाय बाहेर पडण्यासाठी साधन नाही, एवढेच नव्हे तर सर्व कढया तेलंगणाच्या काठावर म्हणजेच नदिच्या दुसऱ्या/ पलिकडील काठावर दिसत होत्या. त्यामुळे येथून दवाखान्यात कसे न्यावे हया चिंतेत सर्वजण असतानाच एक २५ वर्षाचा तरुण अचानक तेथे आला. त्याने परस्पर कढई त्या
काठावरुन मोबाईल करुन बोलावून घेतली. मेव्हण्यास सामान आणण्यास सांगीतले. कढई आल्यानंतर मला कढईत उचलून ठेवले. सर्वांना कढईत बसवून तेलंगणाच्या काठावार आणले. तेथे काठावर अगोदरच त्या तरूणाने प्राथमिक आरोग्य केंद्राची अम्ब्युलंस बोलावून ठेवली होती, माझी पत्नी सतत रडत असल्यामुळे तो तरुण तिला सतत धीर देत होता. हा श्री श्रीपाद वल्ल्भांच्या वास्तव्याचा / प्रभावाचा परिसर असुन काकांच्या जीवास काहीही धोका होणार नाही असे समजावीत होता. काठावर उभ्या असलेल्या अँब्यूलंसमध्ये त्या तरुणाने मला उचलून ठेवले. मला सतत खूप तहान लागत होती, त्याने तेथे दर्शनासाठी आलेल्या एका प्रवाशाकडुन ३-४ पाण्याच्या बाटल्या आणल्या.
रूग्णवाहिका तेथूनच २० कि.मी. अंतरावर असणा-या प्राथमिक आरोग्य केंद्रात आली. तेथे उपचाराची व्यवस्था नव्हती. प्रथमोचार करुन त्यांनी रायचूर येथे जाण्यास सांगीतले. रायचूर तेथून ४० कि.मी. अंतरावर होते. प्राथमिक आरोग्य केंद्राची रूग्णवाहिका कार्यक्षेत्राबाहेर जात नसल्यामुळे त्या तरुणाने तोपर्यंत दुसरी रुग्णवाहिका बोलावून ठेवली होती. त्या तरुणाने तेथून आम्हास रायचूर येथील एका मोठया हॉस्पीटलमध्ये नेले. त्याने व मेव्हण्याने तेथील डॉक्टरांना हया प्रसंगाची पूर्ण माहिती दिली. डॉक्टरांनी मला पुन्हा पुन्हा विचारले की, तुमचा पाय नक्की मगरीनेच धरला होता का ? कारण मगरीचे विष वर वर शरीरात चढत नाही मात्र इतर दुस-या कोणत्याही प्राण्याने धरला असेल तर मात्र विष सर्व शरीरात पसरू शकते. मी पाय मगरीनेच पकडला होता याची त्यांना खात्री दिली. हयावर उपचार दिर्घकाळ करावे लागतील व त्यासाठी आपण येथे थांबुन ते घेणार का याबाबत डॉक्टरांनी आम्हाला विचारले. आम्ही पुण्याचे असून दिर्घकाळ येथे उपचारासाठी राहणे सर्वच दृष्टीने अडचणींचे असून आपण पेशंटला पुण्यापर्यंत जाण्याइतपत उपचार करुन देण्याची विनंती केली. त्यांनी मला ॲडमिट करून आवश्यक त्या सर्व टेस्ट केल्या. जखम बघितली. आयसीयू मध्ये ठेवण्यात आले. ताजे रक्त दयावे लागेल असे सांगीतले. त्या तरुणाने दुस-या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत फिरुन ताजे रक्त आणले. डॉक्टरांनी संध्याकाळी मला ते दिले. डॉक्टरांनी किती दिवस रहावे लागेल हे सध्या सांगता येणार नाही असे सांगितले. सोबत पैसे नेमकेच होते, एटीएम प्रामुख्याने ड्राय आढळून आले. घरी तोपर्यंत कोणालाच काही कळविले नव्हते.
डॉक्टरांनी दोन दिवस उपचार केल्यानंतर पुणे येथे जाण्याची परवानगी दिली. त्या तरुणाने पुण्यापर्यंतची रुग्णवाहिका ठरवून दिली. डॉक्टरांनी सोबत आवश्यक ती औषधे दिली. सोबत एखादे डॉक्टर देण्याची त्यांना विनंती केली असता त्यांनी रुग्णाची परिस्थीती स्टेबल असून त्यांचे फोन नंबर्स दिले. कर्नाटक सिमेपर्यंत पेशंटला त्रास सुरु झाल्यास ते हॉस्पीटल सरकारी असो अथवा खाजगी असो त्यांना फोन करणेविषयी सांगीतले. आम्ही त्यांना उपचाराविषयी सूचना देऊ, काळजी करु नका असेही सांगितले. एकदा तुम्ही सोलापूर जिल्हयात प्रवेश केल्यावर तुम्हास तुमचेच राज्य असल्यामुळे अडचण येण्याचे कारण नाही. सोबत औषधे दिलेलीच आहेत असे म्हटले.
रायचूर येथून निघण्याच्या आदल्या दिवशी मेव्हण्याने फोनवरुन हया घटनेची माहिती माझा मुलगा, सून, मुलगी, जावई यांना दिली. आपण कोणीही येथे येवू नये, आम्हीच उदया पुणे येथे येत आहोत असे सांगीतले. दोनच दिवसांनी म्हणजे दिनांक १४.१०.२०१७ रोजी सकाळी ५ वाजता निघून पुणे येथे संध्याकाळी सहा वाजता पोहोचलो. त्या दिवशी बहुतेक शनिवार होता. सूनबाई सौ. अश्विनी जोशी -कुलकर्णी या सह्याद्री हॉस्पीटल मध्येच डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी हि बातमी समजताच रायचूर येथील डॉक्टरांना फोन करुन पायाचे फोटो, रिपोर्टस मागवून घेतले. सह्याद्री मधिल मोठ्या डॉक्टरांशी चर्चा करुन ॲडमिशन प्रोसीजर पूर्ण करुन ठेवली असल्याने रुग्णवाहिका सरळ सह्याद्री हॉस्पीटलला नेण्यात आली. पुन्हा फोटो,रिपोर्टस इ. पूर्ण करुन संध्याकाळी ७-८ च्या दरम्यान उर्वरित कागदोपत्री व्यवहार पूर्ण करून रूममध्ये दाखल केले.
दुस-या दिवशी रविवार असल्यामुळे सोमवारपासून प्रत्यक्षात उपचार सुरु झाले. डॉ. नाफाडे साहेब, डॉ. कोलतेसाहेब ह्यांच्या मार्गदर्शनाखाली पहिले ऑपरेशन १६.१०.२०१७ रोजी पाडव्याच्या दिवशी झाले. मगरीने पाय अस्ताव्यस्त फाडला होता. गुडघ्याच्या खाली पायाचे हाड सोडल्यास काहीच शिल्लक राहीले नव्हते. डॉक्टरांसमोर मोठे आव्हानच होते. मला बी पी, मधुमेह नसल्यामुळे उपचारास प्रतिसाद व डॉक्टरांना त्वरीत निर्णय घेणे सहायभूत ठरले असे मला वाटते.
घरची माणसे घाबरलेलीच होती. जे काही निर्णय घ्यायचे ते डॉ. नाफाडे साहेब, व डॉ. कोलते साहेत यांनी धाडसाने घेतले. उपचाराची संपुर्ण माहिती सुनबाईस डॉक्टरांकडुन मिळत होती. ऑपरेशन झाल्यानंतर व भूल उतरल्यानंतर होणारा त्रास शब्दात सांगता येणारा नाही. त्यानंतर दुसरे ऑपरेशन काही दिवसांनी झाले, तिसरे ऑपरेशन टाळण्यासाठी डॉक्टरांनी जाणीवपुर्वक प्रयत्न केले. हयाबाबतही डॉ. नाफाडेसाहेबांनी धाडसाने निर्णय घेतला. वैद्यकीय शास्त्राबाबत मला काही माहिती नाही त्यामुळे उपचाराबाबत उपचाराच्या दरम्यान आलेल्या अडचणीबाबत डॉ. नाफाडे साहेबच सांगू शकतील. एवढे मात्र नक्की आहे की, डॉ. नाफाडे साहेबांचे त्यांच्या पेशातील ज्ञान, त्यांचे शर्थीचे प्रयत्नच मला हया प्रसंगातून वाचवू शकले . श्री श्रीपाद वल्ल्भांनीच त्यांना वेळोवेळी प्रेरणा दिली हे मात्र निश्चीत. दवाखान्याच्या वातावरणापेक्षा घरचे वातावरण वेगळे असल्यामुळे त्याचा फायदा प्रकृती सुधारण्यासाठी होतो व त्यामुळे आता दवाखान्यातुन घरी जाण्याची सुचना डॉ. नाफाडेसाहेबांनी केली व ड्रेसिंगसाठी दर बुधवारी/शनिवारी येण्याविषयी सांगीतले. १-२ ड्रैसिगनंतर भूल न देता ड्रेसिंग करण्यासाठी डॉ. नाफाडेसाहेबांनी धैर्य दिले. जास्त वेळा भूल देण्याचे तोटे समजावून सांगितले. प्रचंड भिती मनात होती. डॉ. सा